मला अगदी लहानपणापासून पुस्तके वाचण्याचा छंद होता. माझी वाचनाची सुरुवात प्रथम वर्तमानपत्रांपासुन झाली. वडील रोज वर्तमानपत्र आणित, ते शक्या तेवढे वाचण्याचा मी प्रयत्न करीत असे. मी वर्तमान पत्रातला अग्रलेख वाचावा असा मला वडील आग्रह करीत. अग्रलेख नेहेमी माहितीपुर्ण असतात असे त्यांचे मत होते. त्याच काळात मला वर्तमानपत्रातील कात्रणे जमा करण्याचाही छंद जडला. वर्तमानपत्रात प्रकाशित होणारे विविध देशांचे नकाशे आणि केबीके या इन्फोग्राफीक संस्थेने प्रकाशित केलेले वेवेगळ्या विषयांवरचे आलेख संग्रहीत करणे हा माझा प्रमुख छंद होता. ती कात्रणवही अजुनही माझ्याकडे आहे.
इयत्ता पाचवी मध्ये प्रवेश घेतल्यानंतर आम्हाला इंग्रजी हा विषय सुरु झाला. मला इंग्रजी शिकणे सोपे जावे या उद्देशाने माझ्या मोठ्या भावाने, उमेशने मला अनेक कॉमिक पुस्तके आणुन दिली. या कॉमिक्सनी माझ्या कोवळ्यामनावर चांगले संस्कार घडविण्याचे, इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याचे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला वाचनाची आवड लावण्याचे अमुल्य कार्य केले. त्यासाठी मी माझा मोठा भाऊ ऊमेश याचा सदैव ॠणी राहील.
लहानपणी शाळेत असताना आणि नंतर कॉलेजमध्ये गेल्यावरही मी कुठल्याही ग्रंथालयाचो सभासद नव्हतो. शाळेत असताना आम्हाला कधी ग्रंथालयातून पुस्तके दीलीच नाहीत. त्याचा उपयोग फक्त मास्तर लोक करीत. कॉलेजमध्ये गेल्यावरही परिस्थितीत फारसा बदल झाला नाही. आम्हाला फक्त आमच्या कॉलेजच्या अभ्यासाच्या विषयाशी निगडित पुस्तकेच दिली जात. ख-या ग्रंथालयाचा पहिला अनुभव घेतला तो मरिन लाईन्स येथल्या अमेरिकन लायब्ररी मध्ये. ही लायब्ररी पुर्णपणे मोफत होती. अमेरीकन सरकार तिला पैसे पुरवायची. एक आदर्श लायब्ररी कशी असावी याचा ते एक जिवंत नमुना होती. संपुर्ण लायब्ररी मध्यवर्तीरीत्या वातानुकूलीत होती. लायब्ररीती सर्व पुस्तके अगदी कोरी करकरीत होती. त्यांचा संदर्भ विभाग पाहुन तर मला वेड लागायची पाळी आली. इतका परिपुर्ण आणि समृध्द असा संदर्भ विभाग मी याआधी कधीही पाहिला नव्हता. लायब्ररीत प्रवेश केल्यावर आपण जणुकाही अमेरिकेत गेलो आहोत असा भास व्हायचा. कॉलेज सुटल्यानंतर त्या लायब्ररीतल्या संदर्भ विभागात तासनतास बसणे हा माझा रोजचा शिरस्ता झाला होता. काही काळ मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे सभासद होतो. परंतु घरापासून लांब असल्याने मी त्याचा फारसा उपभोग घेऊ शकलो नाही.
१९९० मध्ये मी माझे कॉलेजचे शिक्षण अर्धवट सोडून भारत पेट्रोलियम या कंपनीत तांत्रिक शिक्षणाची उमेदवारी स्विकारली. भारत पेट्रोलियम कंपनीतल्या स्पोर्टस क्लब मध्ये कंपनी कर्मचा-यांसाठी एक लहान पण सुसज्ज लायब्ररी होती. ही लायब्ररी आम्हा एप्रेंटीस लोकांनाही खुली होती. लायब्ररीचे संचालन कामगारांच्याच हातात असल्याने त्यात प्रामुख्याने चावट कथा कादंब-यांचाच भरणा होता. तरीही काही प्रमाणात माहीतीपुर्ण पुस्तकेही होती. माझ्या दीर्घ वाचनाची सुरुवात याच वाचनालयापासुन सुरु झाली. माझा वाचनाचा वेग कमी असल्याने मला जाड कादंब-या वाचण्यास बराच वेळ लागतो. तरी प्रत्येक दिवशी किमान १० पाने तरी वाचावीत असा माझा प्रयत्न असतो.
या ब्लॉगमध्ये मी वाचलेल्या पुस्तकांची नॊंद करणार आहे. त्या पुस्तकाचा सारांश आणि त्या पुस्तकाबद्दलचे माझे मत आणि टीप्पणी मी देणार आहे. माझी स्मृती फारशी चांगली नसल्याकारणाने मी वाचलेली पुस्तके कालौघात मी विसरुन जातो. मला पुस्तकाचे नाव आठवते परंतू त्यापुस्तकातील कथा अथवा माहीती यांचा संदर्भ मी विसरुन जातो. या ब्लॉगमध्ये त्याची कायमस्वरुपी नोंद झाल्याने माझ्या मेंदूचा भार आता काहीसा कमी झाला आहे. परंपरागत डायरीची जागा आता इंटरनेट्वरील ब्लॉग्सने घेतली आहे. ही सुविधा इंटरनेटवर आधारीत असल्याने त्याला स्थल-कालाचे बंधन नाही. तुम्ही मुंबईमध्ये असाल कींवा लॉस एंजल्स मध्ये असाल, तुम्हाला तुमचा ब्लॉग इ-मेल प्रमाणे कुठूनही वापरता येतो. तुम्ही तुमच्या ब्लॉगद्वारे तुमचे विचार जगभरच्या लोकांपर्यंत पोहोचवू शकता. आणि अगदी महत्त्वाचे म्हणजे ही सुविधा अगदी पुर्णपणे मोफत आहे. यूनिकोड फॉंटचा वापर करुन तुम्ही माझ्याप्रमाणे आपल्या भाषेमध्ये आपले मत व्यक्त करु शकता. खरोखर राष्ट्र, धर्म, वंश, भाषा हे सर्व भेदभाव विसरुन सर्व जग कसे जवळ आलेले आहे याचा हा एक अभूतपूर्व अनुभव आहे.
Thursday, December 1, 2005
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment