
मला आता नक्की आठवत नाही पण आठवी ते दहावी इयत्तेत असताना कधीतरी मराठीच्या पुस्तकात “भाऊसाहेबांची बखर” या कादंबरीवर आधारीत, “आपेश मरणाहून ओखोटे” हा अगदी पहिलाच धडा होता. त्याची भाषा प्राचीन मराठी भाषेवर आधारीत होती, त्यामुळे समजायला अतिशय कठीण होती. पहिलाच धडा असा कठीण पाहून मी हादरलोच. त्या धड्यातील एकही शब्द मला समजत नव्हता. पण त्यानंतर आमच्या शाळेतील मराठी विषयाच्या शिक्षिकेने तो धडा जेव्हा अतिशय सोप्या भाषेत समजावून दिला, तेव्हा कुठे हायसे वाटले. त्यानंतर भितीची जागा उत्सुकतेने घेतली. पानिपतच्या लढाईबद्दल प्रथमच इत्यंभूत माहिती मिळाली. त्या धड्यातील काही वाक्ये आम्हा विद्यार्थ्यांत अतिशय लोकप्रिय झाली होती. दत्ताजी शिंद्यांच अजरामर झालेले वाक्य “बचेंगे तो और भी लढेंगे”, “सिर सलामत तो पगडी पचास”, “भडभुंज्याने लाह्या भाजाव्यात तसे लोक भाजून निघाले” इत्यादी.
१९८५-८७ दरम्यानच्या या अनुभवानंतर २००६ साली विश्वास पाटील यांनी याच विषयावर लिहीलेले “पानिपत” हे पुस्तक वाचण्याचा योग आला, आणि गतस्मृतींना उजाळा मिळाला. आतापर्यंत मी वाचलेल्या सर्व पुस्तकांत हे पुस्तक सर्वोत्कृष्ट होते असे मी म्हणेन. विश्वासरावांची भाषाशैली आणि लेखनकौशल्य अतुलनिय आहे याची हे पुस्तक वाचताना प्रचिती येते. संपुर्ण पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा येत नाही. युध्दासारखा हिंस्त्र आणि बिभत्स प्रसंगही त्यांनी कौशल्याने हाताळला आहे आणि वाचकाला त्याची फारशी कीळस वाटणार नाही याची त्यांनी काळजी घेतली आहे. तरीही माझ्या अनेक मित्रांनी ज्यांनी पानिपत वाचले आहे, त्यांनी हे पुस्तक वाचताना अंगावर काटा येतो असा अभिप्राय दिला. संपुर्ण पुस्तकात युध्द आणि युध्दच असल्यामुळे हिंसाचाराचे वर्णन असणे साहजिकच आहे.
पुस्तक वाचताना काही ठीकाणी वर्णन अवास्तवरीत्या वाढल्याचे आढळते. विशेशकरून भाऊसाहेब आणि अब्दाली यांना पडणाऱ्या स्वप्नांचे वर्णन अवास्तव आणि आणि विनाकारण घुसविल्यासारखे वाटते. इतिहास कथारुपात सादर केल्यामुळे त्यात मनोरंजकता आणण्यासाठी लेखकाने असे केले असण्याची शक्यता आहे. केवळ इतिहास वर्णन या उद्देशाने हे पुस्तक लिहीण्याचे ठरविले असते तर ५०० पानांचे हे पुस्तक २५० पानांतच आटोपले असते.
पानिपतच्या युध्दात मराठ्यांचा दारुण पराभव झाला हे जगजाहिर आहे. हे पुस्तक वाचताना या पराभवाची कारणे जी माझ्या लक्षात आली ती खालील प्रमाणे आहेत.
१. मराठी लष्करातील यात्रेकरुंचा आणि बुणग्यांचा भरणा लष्कराला भोवला. १००००० हुन अधिक लोकांत फक्त ४०००० लढाऊ सैनिक होते. इतर बिनलढाऊ लोकांच्या बोझ्यामुळे लष्कराची उपासमार झाली आणि वेगवान लष्करी हालचाली करता आल्या नाही.
२. लढाईत स्त्रियांना, आप्तांना सोबत घेऊन जाण्याची परंपरा घातक होती. लढाईत राजा, सरदार मेला तरी त्यांचा वंश पुढे चालवण्यासाठी पुढे तरतुद करण्याचे शहाणपण त्यानी दाखविले नाही.
३. लष्करात शिस्त आणि नियंत्रणाचा अभाव होता. एकदा भाऊंनी गोलाची लढाई खेळण्याचे ठरविल्यावर, त्यांचे न ऎकता गोल तोडणारे विठ्ठल विंचूरकर आणि दमाजी गायकवाड हे सर्वात मोठे युध्द अपराधी होते.
४. लढाई संपायच्या आतच मैदान सोडून पळणारे मल्हारराव होळकर हे दुसऱ्या क्रमांकाचे युध्द अपराधी होत. अशा युध्दातुन पळून आलेल्या लढाऊ लोकांना मराठी शासनाने जबर शिक्षा करणे आवश्यक होते. त्याने इतरांवर जरब बसली असती. पळपुटेपणा हे पानिपतच्या लढाईतल्या पराभवाचे मोठे कारण आहे.
५. संपुर्ण लढाईत यमुना नदी ओलांडता न येणे, अब्दालीचा नायनाट न करता कुंजपुऱ्यावर हल्ला करणे, आजुबाजुच्या राजेरजवाड्यांकडुन सहकार्य मिळण्यात अपयश, लष्करात शिस्त राखण्यात अपयश, आधीच्या लढायांत मुलूख जिंकल्यानंतर त्याचा योग्य नागरी आणि लष्करी बंदोबस्त न करणे यांसाठी भाऊसाहेब आणि संबंध पेशवाई जबाबदार आहे.
६. लढाईत मराठी लष्कराचे हाल होत असताना त्यांना त्वरीत कुमक करण्याचे सोडून, लग्नकार्यात गुंतलेले नानासाहेब पेशवेही या प्रचंड नरसंहारास कारणीभूत आहेत.
इतिहास बदलता येत नाही, पण त्यातून बरेच काही शिकता येते. या युध्दकथेतुन मराठ्यांचा गर्विष्ठपणा, शिस्तीचा अभाव आणि दुरदृष्टीचा अभाव प्रामुख्याने दिसुन येतो. त्यामुळे या कथेचा अंत पराभवात न झाल्यासच नवल वाटेल. आजही परिस्थिती फारशी बदललेली नाही. आज अब्दालीची जागा पाकिस्तान, चीनने घेतली आहे. अशा वेळी नाहक गर्विष्ठपणा सोडून हुशारीने, दुरदृष्टीने शिस्तबध्द हालचाली करुन शत्रुचा पराभव केला पाहिजे. अन्यथा आणखी एका पानिपताची पुनरावृत्ती होणे अटळ आहे. तसे न होवो आणि ईश्वर सर्वांना सद्बुध्दी देवो.