या शतकामध्ये जगातील सर्वच समुदांची सरासरी पातळी लक्षणीय प्रमाणात आणि अत्यंत नाट्यपूर्ण रीतीनं वाढेल, आणि त्याचा परिणाम म्हणून हिमनद्यांच्या पट्ट्यांत 'भूकंप' होतील, असं भाकित एका नवीन अभ्यासाच्या आधारानं करण्यात आलं आहे. याबाबतचा अभ्यासअहवाल 'सायन्स' या विख्यात नियतकालिकामध्ये अलीकडंच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालानुसार 2100 सालापर्यंत पृथ्वीचं तापमान चांगलंच वाढलं असेल. त्यामुळे ग्रीनलँडमधील बर्फ वितळू लागेलच; पण उत्तर ध्रुवावरील बर्फही झपाट्यानं कमी होऊ लागेल.
यापैकी एक अहवाल अरिझोना युनिव्हसिर्टीच्या अभ्यासकांनी तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी आतापर्यंत हवामानविषयक करण्यात आलेल्या अभ्यासांचाही आधार घेतला आहे. ते अभ्यास आणि ताजी निरीक्षणे यांच्या आधारे हे अभ्यासक असं म्हणतात की या शतकाच्या अखेरीस समुदाची सरासरी पातळी काही मीटर्सनी वाढेल. परिणामी अनेक भूभाग पाण्याखाली जातील. त्याचं कारण अर्थातच पृथ्वीवरील वाढतं तापमान हेच असेल. या वाढत्या तापमानाचा आणखी एक परिणाम दुसऱ्या एका अभ्यासामध्ये नमूद करण्यात आला आहे. त्यानुसार अमेरिकेतील मॅनहॅटन भागाच्या आकाराच्या हिमनद्या आपल्या स्थानावरून अचानकपणं सरकतील. त्यालाच हे अभ्यासक 'हिमनद्यांचा भूकंप' असं म्हणतात. या सरकण्यामुळे बसणारा धक्का 'हालचालीची तीव्रता' या परिणामात सांगायचा तर तो 5.1 तीव्रतेचा असेल. 'हालचालींच्या तीव्रतेचा धक्का' हा भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या 'रिश्टर परिणामा'सारखाच असल्याचंही हे अभ्यासक सांगतात. अशा प्रकारचे धक्के गीनलँडमध्ये अधूनमधून बसतच असतात; परंतु सन 2002पासून त्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.
या धक्क्यांची उकल करताना हे अभ्यासक सांगतात की हिमनद्या आणि त्यावरी बर्फ वितळू लागला की त्यापासून निघणारं पाणी हळूहळू हिमनदीच्या तळाला जाऊ लागतं. अशा पाण्याचा पुरेसा साठा हिमनदीच्या तळाला जमा झाला की तो हिमनदीच्या मोठाल्या हिमखंडांच्या हालचालींसाठी चांगला आधार ठरतो. त्याचाच आधार घेऊन प्रचंड आकाराचे हिमखंड आपल्या स्थानावरून हालतात आणि समुदात जातात. यातील महत्त्वाचा भाग असा की ग्रीनलँडमधील या हिमामध्ये ताज्या गोड्या पाण्याचा मोठा साठा आहे. तोच समुदार्पण होणार असल्यानं त्याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. एकतर समुदाची पातळी वाढेल आणि दुसरे म्हणजे पृथ्वीवरील गोड्या पाण्याचे साठे कमी होतील. आणि त्याचा फटका मोठा असेल. या अभ्यासकांनी आणखीनही एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं आहे. भूगर्भातील हालचालींमुळे होणाऱ्या भूकंपांसाठी ग्रीनलँड हा भाग काही प्रसिद्ध नाही. परंतु 1993 ते 2005 या काळामध्ये असे 182 धक्के या भागात बसल्याचे सिस्मोमीटर्सवरून दिसते. यातील 136 धक्के 4.6 ते 5.1 रिश्टर तीव्रतेचे होते. त्याचा परिणाम या भागातील बर्फ कमी होण्यात झाला आहे, असंही या अभ्यासकांनी म्हटलं आहे. थोडक्यात, हवामानातील बदलाचे गंभीर दृश्यपरिणाम आता जाणवू लागले आहेत. त्यामुळेच त्याबाबतचा अभ्यासही अधिक प्रमाणात करण्यात येत आहे.
या अभ्यासाचा एक भाग म्हणून नासानं अलीकडंच दोन उपग्रह अवकाशात सोडले आहेत. 'क्लाऊडसॅट' आणि 'कॅलिप्सो' अशी नावं असलेले हे उपग्रह पृथ्वीपासून 705 कि.मी. अंतरावरून पृथ्वीभोवती फिरतील. या उपग्रहांचं काम ढगांची निमिर्ती नेमकी कशी होते आणि हवेतील सूक्ष्म कण कसे तयार होतात, याचा शोध घेण्याचं असेल. आता या दोन्हींच्या निमिर्तीचा वेध कशासाठी घ्यावयाचा, असा प्रश्ान् पडू शकेल. परंतु वातावरण तापणं किंवा ते थंड होणं यास विविध प्रकारचे ढगच जबाबदार असतात. त्यामुळेच त्यांचा अभ्यास आता महत्त्वाचा ठरत आहे. आपल्याला ढग दिसतात ते आडवे पसरलेले. परंतु त्यांच्या उंचीचा आपल्याला काहीच पत्ता नसतो. या उपग्रहांमुळं ढगांच्या उंचीचा अंदाज येईलच; पण त्या उंच आकाराची नेमकी रचना कशी आहे, तेसुद्धा समजू शकेल. या ढगांचे वरपासून तळापर्यंतचे निरीक्षण संशोधकांनी करता येऊ शकेल; कारण हे उपग्रह त्यांची तशाच प्रकारची छायाचित्रं घेतील. या ढगांचा आणि सूक्ष्मकणांचा वातावरण तप्त होण्यातील वाटा किती आहे, तेसुद्धा समजू शकेल. महत्त्वाचं म्हणजे पाऊस पाडणाऱ्या ढगांचं प्रमाण किती आहे, तेसुद्धा कळू शकेल. पृथ्वीभोवतालच्या ढगांमध्ये किती पाणी आणि बर्फ आहे, त्याचा वेधही क्लाऊडसॅट हा उपग्रह घेणार आहे. तर कॅलिप्सोमुळं हवेतील सूक्ष्मकणांचं प्रमाण समजू शकेलच; पण डोळ्यांना दिसणारे अतिशय पातळ अशा ढगांचाही वेध हा उपग्रह घेणार आहे. या ढगांमध्ये ऋतुमानाप्रमाणं बदल होतो का आणि होत असल्यास काय होतो, त्याचा शोध हा उपग्रह घेईल.
थोडक्यात काय, तर आता हवामानाचा सर्वांगीण वेध आणि अभ्यास करणं सुरू झालं आहे. परंतु त्यामधून हाती येणाऱ्या माहितीचा उपयोग करून घेऊन आपण आवश्यक ते धोरणात्मक बदल केले नाहीत, उष्णताशोषक वायूंचं प्रमाण आटोक्यात ठेवलं नाही, तिवरांसह इतर वनस्पतींच्या तोडीस आळा घातला नाही, प्रदूषणावर नियंत्रण ठेवलं नाही, तर हे सारे अभ्यास अर्थशून्य ठरतील. याचं कारण असे बदल जागतिक पातळीवर होत नाहीत, तोपर्यंत बदलणाऱ्या हवामानाचा आणि त्याच्या दुष्परिणामांचा मुकाबला करणं अवघडच आहे.
Sunday, September 17, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment