Saturday, February 16, 2008

लज्जा - तस्लीमा नसरीन (अनु. लीना सोहोनी) (दर्जा ***)

१९७२ साली भारताने बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यावेळी हा देश आपले हे उपकार एवढ्या लवकर विसरेल असे वाटले नव्हते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षांतच या देशाने इस्लामिकरण चालू केले, आणि देशातील इतर जमातींना या ना त्याप्रकारे देशाबाहेर हाकलून द्यायला सुरु केले. १९९२ चे बाबरी मशिद प्रकरण तेथिल हिंदू लोकांना बाहेर हाकलण्यास पुरेसे होते. तस्लिमा नसरीन यांनी लिहीलेले हे पुस्तक बाबरी मशिद उध्वस्त झाल्यानंतरच्या बांग्लादेशमधिल परीस्थितीचा आढावा घेते. त्यासाठी तिने सुरंजन नावाच्या काल्पनिक हिंदू पात्राचा आणि त्याच्या कुटूंबियांवर गुदरलेल्या प्रसंगाचा आधार घेतला आहे. बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याच्या वेळी तेथे हिंदुंचे प्रमाण जवळ्जवळ २० टक्के होते ते आता ५ टक्के राहीले आहे. यावरुनच किती लोकांनी तिथून पलायन केले आहे हे लक्षात येते. या लोकांचे गंतव्यस्थान भारत असणार हे वेगळे सांगायला नको. आधिच प्रचंड लोकसंख्येच्या बोज्याखाली चिरडलेल्या भारताला आणखी किती निर्वासितांचा बोजा सोसावा लागणार आहे कोण जाणे. काही वर्षांपुर्वीच फिजीतून भारतीय लोकांना हाकलण्यात आले. आता मलेशियातील भारतीय लोकांवर अत्याचार होत असल्याचे ऐकायला मिळते. भारत सरकारने त्यावर काळजी व्यक्त करताच, आमच्या अंतर्गत मामल्यात ढवळाढवळ करु नका अशी चपराकही देण्यास मलेशिया सरकारने कमी केले नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची पत किती आहे हेच या प्रकरणातून दिसून येते. मलेशिया तर सोडाच पण ज्या बांग्लादेशाला आपण एकेकाळी हजारो सैनिकांचे बलिदान देऊन मुक्त केले, तोही उर्मटपणाची भाषा करतो. भारताच्या मिळमिळीत आंतरराष्ट्रीय धोरणाचीच ही परिणीती आहे.

१९९२ साली एक बाबरी मशिद पाडताच मुस्लिम जगाने एवढा हंगामा केला, परंतु त्यानंतर सर्व मुस्लिम राष्ट्रांत हजारो मंदिरांची मोडतोड करण्यात आली त्याबद्दल कोणीच काही बोलत नाही. तस्लिमाने एक मुसलमान असुनही हिंदुंच्याबाजूने लिहीलेली ही कथा विलक्षण आहे. यात तिने १९९२ च्या दंगलीनंतर घडलेल्या घटनांचे सविस्तर वर्णन केले आहे. काही ठिकाणी हे वर्णन भलतेच लांबले आहे, पण आपण ते टाळूनही पुस्तकाचे वाचन करु शकतो. या दंगलीचा सुरंजन या आशावादी हिंदु कुटुंबावर झालेला परीणाम, सुरंजनची मनोवस्था, त्याचे वडील सुधामय बाबूंचा बांग्लादेशमधिल जातीय सलोख्यावरील विश्वास आणि देशप्रेम, त्याची आई किरणमयी हिची हतबलता यासर्वांचे सुरेख वर्णन तस्लिमा बाईंनी केले आहे. या मुळ बंगाली भाषेतील पुस्तकाचा मराठी भाषेत लिना सोहोनी यांनी केलेला अनुवाद अतिशय सुरेखा झाला आहे.

तसे पाहीले तर या पुस्तकात लेखिकेने इस्लाम धर्माविषयी कोणतीही टीका अथवा टीप्पणी केली नाही आहे. तरी या पुस्तकावर बांग्लादेशमध्ये बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम समाज या लेखिकेवर संतप्त असून तिच्यावर हल्ले आणि फतवे काढण्यात आले आहेत. सध्या लेखिका भारतात आश्रीत असून तिला सुरक्षेच्या कारणावरुन राजस्थानमध्ये वास्तव्य करावे लागते आहे. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षही मुस्लिम समाजाची नाराजी टाळण्यासाठी लेखिकेला भारतात कायमचा आश्रय देण्यास तयार नाही. केवळ वोट बॅंक जपण्यासाठी हे राजकीय पक्ष काहिही करण्यास तयार असतात. या पुस्तकात बांग्लादेशमध्ये घडत असलेली एक सत्य घटना जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ एका ठराविक समाजाची नाराजी टाळण्यासाठी त्यावर बंदी घालणे अथवा तिच्या लेखिकेला निर्वासित करणे म्हणजे मानवतेला आणि व्यक्तिस्वातंत्र्याला काळिमा फासण्यासारखे आहे.

No comments: