या कादंबरीतून महासागरांचा इतिहास, जमिनीखाली आणि समुद्रामध्ये कशा प्रकारे संशोधन होते, संशोधकांचे जीवन कसे असते, सैनिक म्हणजे नक्की काय असतो, निसर्गाची उत्पत्ती कशी झाली आणि अशा प्रकारची बरीच माहिती मिळवता येईल. हे पुस्तक म्हणजे एक अशी कथा आहे, जिथे सर्व काही संपतं आणि सर्वांना पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागते. ही सुरुवात नव्या जगाची आहे, नव्या जगण्याची आहे, जगण्याची नाही तर नव्याने जगवण्याची आहे, नव्याने घर शोधण्याची आहे, गमावलेल्या सर्व गोष्टी पुन्हा नव्याने कमावण्याची आहे.
लेखकाला लहानपणापासून संशोधक होण्याची इच्छा, म्हणून भरपूर पुस्तके वाचून काढली. अनेक संशोधकांचे चरित्र वाचले. सर्वकाही सुरळीत चालू होते आणि त्यातच मिलिटरी स्कूलमध्ये शेवटच्या वर्षी लेखकाचा अपघात झाला. नंतर रेल्वेमध्ये प्रवास करत असताना अपघात झाला आणि लेखकाची बरीच स्वप्ने धुसर झाली. जास्त धावू नये, जास्त वजन उचलू नये अशी अनेक बंधने लेखकावर आली. संशोधनात काही करता आले नाही याचा खूप त्रास होत होता. संशोधनातून काहीतरी वेगळे प्रयोग करायचे आणि जगाला काहीतरी नवीन दाखवायचं ही खंत काही केल्या मनातून जात नव्हती. तेव्हा आपण पुस्तकाच्या माध्यमातून जगाला नवीन काहीतरी देऊ शकतो असे लेखकाच्या लक्षात आले आणि त्याने दोन पुस्तके लिहिली, मैत्र जीवांचे आणि अग्निपुत्र.
‘मैत्र जीवांचे’ पुस्तकामधून लेखकाने एकाच पुस्तकामध्ये ६ वेगवेगळ्या भाषांचा वापर केला, गुगल संस्थेमधील कामकाज कसे चालते हे दाखविले, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीमधील संस्कृती दाखवली. कादंबरीला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर ब्लॉगच्या माध्यमातून ‘अग्निपुत्र’ नावाची साय-फाय कादंबरी लिहिली, कादंबरीला एका वर्षातच ३,००,००० पेक्षा जास्त वाचकसंख्या लाभली आणि त्यानंतर आता ‘पुन्हा नव्याने सुरुवात’ कादंबरी आपल्यासमोर सादर करत आहे. तिन्ही पुस्तकांमध्ये मुख्य नायक हा संशोधक, डॉक्टरेट किंवा शास्त्रज्ञ आहे. नायकाला ही भूमिका का दिली हे आपल्याला समजले असेलच. पण मुद्दा हा नाहीच आहे, मुद्दा हा आहे कि लेखक तुम्हाला काय देतो आहे. का देतो आहे ते तुम्हाला बऱ्यापैकी कळले असेलच.
आज लेखकाने लिहिलेले पुस्तक वाचत असताना तुम्ही तुमच्या आयुष्याचे काही तास लेखकासाठी, लेखकाच्या पुस्तकासाठी देत आहात, तर ते तास तुमच्यासाठी अविस्मरणीय असावे, त्यातून तुम्हाला काही शिकता यावे, पुस्तक वाचत असताना नुसता विरंगुळा न होता तुम्हाला अशी काही माहिती मिळावी जी तुम्ही कधी ऐकली नसेल किंवा वाचली देखील नसेल आणि पुस्तक वाचल्यानंतर आपण काहीतरी नवीन, वेगळे वाचले आहे याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर असावा हा महत्वाचा मुद्दा आहे, आणि तो मुद्दा या पुस्तकामध्ये देखील तुम्हाला अनुभवायला मिळेल. महासागरांचा इतिहास, जमिनीखाली आणि समुद्रामध्ये कशा प्रकारे संशोधन होते, संशोधकांचे जीवन कसे असते, सैनिक म्हणजे नक्की काय असतो, निसर्गाची उत्पत्ती कशी झाली आणि अशा प्रकारची बरीच माहिती तुम्हाला या कादंबरीमध्ये वाचता येईल.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment