
मी सहसा इंग्रजी पुस्तके वाचत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असल्याने इंग्रजी भाषेत मी फारसा पारंगत नाही. इंग्रजी भाषेतील पुस्तके समजत असली तरी त्यांचा रसास्वाद घेता येत नाही. परंतू अनेक वर्ष इंग्रजी भाषेचा संपर्क आल्याने आता हळूहळू त्या भाषेचा आस्वाद मला घेता येतोय. याचे श्रेय मला टाईम्स ऑफ इंडीया या इंग्रजी दैनिकाला द्यावीशी वाटते. या इंग्रजी वर्तमानपत्राच्या सातत्यपुर्ण वाचनाने आपला इंग्रजीचा शब्दसंग्रह समृद्ध होतो. याशिवाय इंग्रजी भाषेतून घेतलेले संगणकाचे ज्ञान आणि तदनंतर इंटरनेटची मुशाफीरी यांनीही माझी इंग्रजी सुधारण्यात चांगलाच हातभार लावला.
पुस्तक वाचनास सुरुवात केल्यानंतर मी प्रथमच प्रसिध्द लेखक डॅन ब्राऊन यांची डिसेप्शन पॉइंट ही कादंबरी वाचण्यास घेतली. हे पुस्तक वाचायला घेण्यापुर्वी त्यामध्ये काय आहे, अथवा डॅन ब्राऊन यांची लेखनशैली कशी आहे, याबद्दल मला यत्कींचीतही कल्पना नव्हती. परंतू हे पुस्तक हातात घेताच अगदी पहिल्या पानापासूनच मी त्याच्या प्रेमात पडलो. विषय माझ्या आवडीचा अर्थात विज्ञानकथा अधिक अमेरिकन राजनीती असा होता. त्याचबरोबर डॅन ब्राऊन यांच्या सहजसुंदर आणि उत्कंठावर्धक भाषाशैलीने मला खिळवून ठेवले आणि हे पुस्तक पुर्णपणे वाचण्यास भाग पाडले.
या पुस्तकाची कथा वर इंग्रजीत दिल्याप्रमाणे अस्तीत्वासाठी झगडणारी अमेरीकन अंतराळसंस्था नासा आणि राष्ट्रपतीपद मिळवण्यासाठी चाललेली उमेदवारांची जीवघेणी चढाओढ यांची आहे. महत्वाच्या मोहिमांत सातत्याने अपयश आल्याने हतबल झालेली अमेरीकन अवकाशसंस्था नासा कुठल्यातरी जोरदार यशाच्या शोधात असते. या हतबलतेतून मार्ग काढण्याठी एक उच्चपदस्थ अधिकारी एका नव्या शोधाचा बनाव रचतो. तो बनाव उघड होऊ नये म्हणून त्याला अमेरीकेच्याच सैनिकी कमांडोंचा उपयोग अमेरीकी नागरीकांचेच हत्यासत्र सुरु करावे लागते.
हा बनाव उघडकीस आल्यास विद्यमान अमेरीकेचे अध्यक्ष, जे नासाचे कट्टर समर्थक असतात, त्यांची पुनर्निवडणूक धोक्यात येऊ शकते. आणि त्यांचे विरोधक जे नासाला अमेरीकेचे निरर्थक उधळपट्टी करणारे बाळ समजतात, ते निवडून येऊ शकतात. हे टाळण्यासाठी कुठल्याही थराला जायची त्या अधिकाऱ्याची तयारी असते. या जीवघेण्या संघर्षात नायक मायकेल टॉलंड आणि नायीका राचेल सेक्सटन हे दोघेही सापडतात. व कथेच्या अंती तेच या रहस्याचा उलगडा करतात. एकंदरीत यापुस्तकाची कथा एखाद्या देमार इंग्रजी चित्रपटाला साजेशी आहे. भविष्यात या कादंबरीवर आधारीत चित्रपट आल्यास आश्चर्य वाटू नये.
पुस्तकाची कथा छान आहे. शेवट पर्यंत खलनायक कोण हे वाचकापासून लपऊन ठेवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे. लेखकाची लेखन शैली उत्कृष्ट आहे. त्यानी या पुस्तकाचे लिखाण अत्यंत सोप्या इंग्रजी भाषेत केले आहे, त्यामुळे इंग्रजी कच्चे असलेल्या वाचकांनाही ते पचवण्यास अवघड नाही. संपुर्ण पुस्तकात लेखकाने क्लिष्ट वैज्ञानिक माहीती दीली आहे, ती सर्वसाधारण वाचकाला जड जाण्याची शक्यता आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्यासही चालू शकेल. वाचकाला अमेरीकन समाज, त्यांची विचारसरणी, त्यांचा इतिहास, त्यांची वैज्ञानिक आणि लष्करी प्रगती, त्यांच्याकडे अध्यक्षांना देंण्यात येणारे अनन्यसाधारण महत्त्व याची माहिती असल्याच हे पुस्तक अधिक समजेल व त्याचा पुर्ण रसास्वाद घेता येईल.