आज मी जगाची मुशाफिरी हे निरंजन घाटे यांनी लिहीलेले पुस्तक वाचून संपवीले. निरंजन घाटे हे एक उत्कृष्ट विज्ञानकथा लेखक असून काही वेळा इतर किरकोळ लेखनही करतात. त्यांची लेखनशैली सुबोध असून ओघवती आहे, त्यामुळेच ते माझे आवडते लेखक आहेत. हे पुस्तक प्रवासवर्णन असल्याप्रमाणे वाटते परंतू लेखकाने कुठेही प्रत्यक्ष प्रवास केल्याचे म्हटलेले नाही. त्यात जागाच्या कानाकोपऱ्यातल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थळांचे यापुस्तकात वर्णन असल्यामुळे त्यासर्व जागी प्रवास करणे लेखकाला अशक्य असल्याचे वाटते.
पुस्तकात एकूण ८८ पृष्ठे होती. ५ सप्टेंबर २००५ ला हे पुस्तक मी वाचावयास सुरुवात केली आणि १८ सप्टेंबर २००५ ला संपविले. नुकतेच सभासदत्व पत्करलेल्या सदाशिव पेठेतल्या मराठी साहित्य परीषदेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मी मिळवले होते. हे पुस्तक आणि आणखिन एक पुस्तक अनिल काळे यांनी अनुवादीत केलेले ट्रीनिटिज चाईल्ड मी साहित्य परीषदेतून सभासद झाल्यानंतर प्रथमच घेतले. वेळ न पुरल्यामुळे ट्रीनिटिज चाईल्ड हे पुस्तक पुर्ण वाचू शकलो नाही.
पुस्तकाचे लेखक निरंजन घाटे हे एक भूगोलतज्ञ असून पुण्यातच रहातात. विज्ञानविषयक दृष्टीकोन आणि ज्ञान यांचा सर्वसाधारण समाजामध्ये प्रसार करणे हा घाटे यांचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे त्यांचे लिखाण सोपे आणि तांत्रिक क्लिष्टता टाळणारे असते. त्यामुळे माझ्यासारख्या विज्ञानप्रवीण माणसाला त्यांचे लिखाण अपुरे वाटण्याची शक्यता आहे. परंतू घाटे यांचा वाचकवर्ग सर्वसामान्य माणूस आहे हे लक्षात घेतल्यास ते योग्यच असल्याचे जाणवते.
या पुस्तकात लेखकाने जगातल्या विविध देशातल्या वैशिष्ट्यपूर्ण ठीकाणांची आणि तिथल्या लोकांची मनोरंजक माहीती दिलेली आहे. हे पुस्तक म्हणजे एक लेख संग्रह असून तो कुठल्या वर्तमान पत्रात प्रसिध्द झाला होता का याचा लेखकाने कुठेही उल्लेख केलेला नाही. पुस्तकात दिलेली माहिती संक्षीप्त आणि मनोरंजक आहे. पुस्तकात अनेक व्याकरणाच्या चुका असून प्रकाशकाने त्याकडे लक्ष पुरविलेले दिसत नाही.
पुस्तकात एकूण १९ लेख असून लेख क्रमांक ७ जो युरोप मधल्या प्रसिध्द कलाकृतींच्या चोऱ्यांच्या संदर्भात होता मला विशेष करुन आवडला. लेख क्रमांक १० मध्ये लेखकाने मध्य भारतात सापडलेल्या डायनोसॉरच्या अंड्याविषयी लिहीले आहे. त्यात स्थानिक भारतियांनी कसे या अंड्यांना शिवलिंग समजून त्याभोवती मंदीर बांधून त्याची पुजा चालू केलेली आहे याचे वर्णन आढळते. हा लेखही मला आवडला. लेखकाने हे सर्व लेख लिहिण्यासाठी अनेक संदर्भग्रंथांचा वापर केला असल्याचे दिसते. परंतू लेखकाने कुठेही त्यांचा उल्लेख केलेला नाही. ही एक मोठी चूक असून माझ्या सारख्या संशोधक वृत्तीच्या माणसाला अधिक माहीती साठी संदर्भ सुचीचा मोठा उपयोग झाला असता. परंतू आजच्या युगात इंटरनेटवर कुठल्याही गोष्टीचा शोध घेणे सहज शक्य असल्याने जाणकार माणसाला तशी काही अडचण भासण्याची शक्यता नाही.
Monday, August 21, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment