“विज्ञानकथा हा प्रकार मराठीमध्ये तसा नवा नाही. इ.स.१९०० पासून मराठीत विज्ञानकथा लिहिली जात आहे. तेव्हापासूनच्या गेल्या शंभर वर्षातील प्रातिनिधिक विज्ञानकथा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे. या निमित्ताने एकत्र केलेल्या ह्या विज्ञानकथा वाचताना विज्ञानकथेचे स्वरुप कसे बदलत गेले तेही आपल्या लक्षात येते.
मराठी विज्ञानकथेच्या गेल्या शंभर वर्षाच्या वाटचालीत अनेक मोठमोठ्या लेखकांचा हातभार लागला आहे. मराठी विज्ञानकथेच्या अभ्यासाच्या दृष्टीने ह्या संग्रहातील कथा जशा उपयोगी आहेत त्याच बरोबर एकविसाव्या शतकात जाताना मराठी विज्ञानकथेचे साहाय्यही वाचकाला होईल यात शंकाच नाही.”
विज्ञानकथा हा पुर्वीपासून माझा आवडीचा विषय आहे. विज्ञानाधिष्ठीत दृष्टीकोन असल्याकारणानेही त्यातली तांत्रीक क्लीष्टता मला त्रास देत नाही. या कथा वाचण्यापूर्वी विज्ञानातील काही पायभूत नियम आणि माणसाची वैज्ञानिक प्रगती आणि भविष्यकाळातील अपेक्षा वाचकाला माहित असणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा या कथा पुर्णपणे काल्पनिक असुन अतिशयोक्तीपुर्ण आहेत असा समज होण्याची शक्यता आहे. विज्ञान कथा म्हणजे सध्याच्या प्रचलीत विज्ञानाच्या पायावर उभारलेली परंतु भविष्याच्या संभाव्य वैज्ञानिक प्रगतिचा कळस असलेली काल्पनिक कथा असते. ती काल्पनिक असते पण कपोलकल्पित मात्र नसते.
ज्यांना जुन्या काळातील एच. जी. वेल्स, जुल्स व्हर्न या लेखकांनी लिहिलेल्या विज्ञान कथांचा परिचय आहे, त्यांना हे निश्चितच पटेल की विज्ञानकथा म्हणजे अतिशय कल्पक आणि कुषाग्र बुध्दीच्या लेखकाने भविष्याचा घेतलेला वेध असतो. या लेखकांनी एकोणिसाव्या शतकात, ज्यावेळी माणूस उडू शकतो असे म्हणणाऱ्या माणसांना वेडे समजले जायचे, विमानांची आणि अवकाश यानांची कल्पना केली होती आणि त्यावर विज्ञानकथा लिहिल्या होत्या. गंमत म्हणजे त्यानी केलेला कल्पनाविलास आज बऱ्याच अंशी खरा ठरलेला आहे. विज्ञानकथा माणसातील वैज्ञानिक जागा करतात आणि त्याला भविष्याचा वेध घ्यायला लावतात, म्हणून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या मुलाचा बौधिक आणि वैज्ञानिक विकास घडविण्यासाठी प्रत्येक पालकाने त्याला विज्ञानकथा, कादंबऱ्या पुरविणे आवश्यक आहे.
या पुस्तकात श्री निरंजन घाटे यांनी विसाव्या शतकातील मराठी विज्ञानकथा आणि विज्ञानकथाकारांवर दीर्घ संशोधन करुन वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळे विषय आजमावणाऱ्या १८ अतिशय सुंदर विज्ञानकथांचा संग्रह पेश केला आहे. त्यांचा या विषयावरील अभ्यास दांडगा आहे. स्वतः एक विज्ञानकथाकार असल्याने या विषयाची त्यांना चांगली समजही आहे. यापुस्तकासाठी त्यानी २० पानी लांबलचक प्रस्तावना लिहीली आहे, ती काही मला आवडली नाही. प्रस्तावना कधीही एक-दोन पानांपेक्षा जास्त लांब नसावी असे माझे मत आहे. या प्रस्तावनेत त्यानी विज्ञानकथा म्हणजे काय, ती कशी असावी आणि बऱ्याच लोकांनी विज्ञानकथेच्या नावाखाली हिन दर्जाच्या साहित्याचा कसा बाजार मांडला आहे याचे प्रदिर्घ विवेचन केले आहे. माझ्यामते याविषयावर वाद घालण्यासाठी एखाद्या पुस्तकाची प्रस्तावना ही योग्य जागा नव्हती.
या पुस्तकातल्या सर्व १८ कथा अप्रतिम आहेत यांत काही शंका नाही, परंतु अनु. क्र. १ आणि २ च्या जुन्या काळातील “चंद्रलोकातील सफर” आणि “बायकांना उजव्या डोळ्याने दिसत नाही” या कथा काहिशा सुमार दर्जाच्या आणि रटाळ आहेत. कथा जुन्या काळातील असल्याने आणि बहूतेक, संपादकांच्या म्हणण्याप्रमाणे त्या विदेशी साहीत्यांचे स्वैर अनुवाद असल्या कारणाने, लेखकांना निटशा हाताळता आल्या नाहीत. दुर्दैवाने पुस्तकाच्या आरंभिच दोन कथा रटाळ असल्याने निरस होतो. परंतु बाकीच्या सर्व कथा मात्र उत्तम दर्जाच्या आहेत. संपुर्ण संग्रहात “गिनिपिग” “कनेक्शन” आणि “कालदमन” या कथा मला सर्वात जास्त आवडल्या. प्रत्येक विज्ञानप्रेमीने अवश्य वाचावे असे हे पुस्तक आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment