जेरुसलेम, ता. १८ जून २००७ - आधुनिक पदार्थविज्ञान आणि खगोलशास्त्राचे जनक असलेले थोर शास्त्रज्ञ सर आयझॅक न्यूटन यांनी सन २०६० मध्ये जगाचा अंत होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. त्यांनी सन १७०४ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात हे भाकीत लिहिले आहे. ...
जेरुसलेममधील हिब्रू विद्यापीठात सध्या "न्यूटन्स सिक्रेट्स' नावाचे एक प्रदर्शन भरले आहे, त्यात या पत्राचा समावेश आहे. शास्त्रीय हस्तलिखितांचा संग्रह असणाऱ्या एका धनाढ्य व्यक्तीने न्यूटन यांची ही हस्तलिखिते हिब्रू विद्यापीठाला प्रदान केली आहेत. विद्यापीठाने १९६९ मध्ये ही पत्रे मिळाल्यानंतर प्रथमच ती जाहीर प्रदर्शनात मांडली आहेत.
एरवी बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या या शास्त्रज्ञाने हे भाकीत बायबलमधील एका पुस्तकाच्या आधारे वर्तविले आहे. "बुक ऑफ डॅनिएल' या पुस्तकातील काही ओळींचा आधार घेऊन न्यूटन यांनी या पत्रात म्हटले आहे, की पश्चिम युरोपात सन ८०० मध्ये रोमन साम्राज्याची स्थापना झाली; त्यानंतर १२६० वर्षांनी जगाचा अंत होईल.
न्यूटन यांनी सतराव्या शतकात केंब्रिज विद्यापीठात केलेल्या संशोधनाद्वारे, आधुनिक विज्ञानाचा पाया घातला गेला, असे मानले जाते. अर्थात न्यूटन यांनी त्या काळातील काही अंधश्रद्धांचेही पालन केल्याचे दिसून येते. त्यांनी १६७० च्या दरम्यान धातूंचे रूपांतर सोन्यात करणाऱ्या "अल्केमी'वर संशोधन करण्यात चार वर्षे घालविली होती.
जगाचा अंत अमुक वेळी होणार, अमक्या काळात होणार, अशी भविष्यवाणी अनेकदा वर्तविली गेली आहे. मात्र, न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञाचा संबंध या विषयाशी प्रथमच आलेला दिसत आहे. त्यामुळेच हिब्रू विद्यापीठातील त्यांचे पत्र हा अनेकांच्या उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय ठरला आहे.
हॉकिंग यांचाही इशारा
नैसर्गिक किंवा कृत्रिम संकटामुळे पृथ्वीचा विनाश होण्याचा धोका वाढत चालला आहे. त्यामुळेच या अफाट विश्वात मानवाने दुसरे एखादे वसतिस्थान शोधून काढले तरच त्याचे अस्तित्व टिकून राहील; अन्यथा पृथ्वीबरोबरच मानवजातही नष्ट होईल... प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग, १३ जून २००६, हॉंगकॉंग विद्यापीठात.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment