Tuesday, June 19, 2007

पृथ्वीशिवाय जीवसृष्टीची शक्‍यता कोठे?

पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीसंबंधी संशोधकांनी अनेक शक्‍यता वर्तवल्या असल्या, तरी कोणताही ठोस पुरावा अजून त्यांच्या हाती आलेला नाही. मंगळावरील पाण्याच्या शोधामधून तेथील जीवसृष्टीची शक्‍यताही तपासून पाहिली जात आहे. टायटन आणि युरोपा या उपग्रहांचीही या संदर्भात पाहणी केली जात आहे.

भविष्यात पृथ्वीला धोका निर्माण झाल्यास पर्यायी निवासस्थान म्हणून मंगळासह सूर्यमालेतील अनुकूल ठिकाणे तपासली जात आहेत. अर्थात पृथ्वीप्रमाणे अनुकूल वातावरण कोठेच नसून, अत्यंत खर्चिक असे कृत्रिम निवासस्थान मात्र तयार केले जाऊ शकते. मंगळ हाच एक त्यातल्या त्यात अनुकूल ग्रह असल्यामुळे सर्व देशांनी त्यावर नजर रोखली आहे. मंगळाव्यतिरिक्त शनीचा उपग्रह टायटन आणि गुरूचा उपग्रह युरोपा यांवरही जीवसृष्टी असण्याची शक्‍यता वर्तवली जाते.

मंगळावर अद्याप मनुष्य पोचू शकला नाही, त्यावर वस्ती करणे सध्यातरी अत्यंत कठीण गोष्ट आहे. तेथील वातावरण, गुरुत्वाकर्षण, हवेचा दाब या गोष्टी अत्यंत भिन्न असल्यामुळे पृथ्वीवर वाढलेला मनुष्य तेथे फार काळ टिकणे अशक्‍य आहे. तरीही विकसित देश तेथे कृत्रिम वातावरण आणि बाह्य वातावरणाला योग्य अशी घरे बांधायची स्वप्ने पाहू लागले आहेत.

मंगळ, टायटन आणि युरोपाची वैशिष्ट्ये; यावरून तेथे मनुष्याने वस्ती करणे किती अवघड आहे याची कल्पना येईल.

मंगळ - पृथ्वीशी साधर्म्य असणारा सूर्यमालेतील एकमेव ग्रह.
भेट देणारे यान - स्पिरीट ऑपॉर्च्युनिटी, पाथ फाईंडर, मार्स ग्लोबल सर्व्हेयर
त्रिज्या - ३४०२ किलोमीटर (पृथ्वी : ६४०० किलोमीटर)
तापमान - उणे १४० अंश ते २० अंश सेल्सिअस
वातावरणातील वायू - कार्बन- ९५ टक्के, नायट्रोजन- २.७ टक्के, ऑरगॉन- १.६ टक्के, ऑक्‍सिजन- ०.२ टक्के.

टायटन - शनिचा उपग्रह, बुधापेक्षाही मोठा, ऍमिनो ऍसिडचे अस्तित्व, अत्यंत थंड तरीही जीवसृष्टीची शक्‍यता.
भेट देणारे यान - कासिनी- हायगेन्स प्रोब
त्रिज्या - २५७५ किलोमीटर (पृथ्वीच्या चंद्राच्या दीडपट)
तापमान - उणे १७९ अंश सेल्सिअस
वातावरणातील वायू - नायट्रोजन- ९८.४, मिथेन- १.६ टक्के.

युरोपा - गुरूचा उपग्रह, बर्फाचा पृष्ठभाग, जमिनीखाली १०० किलोमीटरपर्यंत पाण्याचा समुद्र आणि त्यात जीवसृष्टीची शक्‍यता.
प्रस्तावित यान - क्रायोबोट (खोल समुद्राचा वेध घेणार)
त्रिज्या - १५६१ किलोमीटर
तापमान - उणे २२३ अंश ते उणे १६९ अंश सेल्सिअस.
वातावरणातील वायू - अत्यंत विरळ, ऑक्‍सिजन आणि हायड्रोजन रेण्वीय स्थितीत.

No comments: