Wednesday, August 1, 2007

बाराला दहा कमी - पद्मजा फाटक, माधव नेरूरकर (दर्जा ****)

विसाव शतक हे हिंसाचार, युध्द आणि रक्तरंजित राज्यक्रांत्या यांच शतक. सगळी युध्द संपवणार एक अखेरच युध्द अशी भाबड्यांची कल्पना झाली होती दुसऱ्या महायुध्दाबद्दल. अणुबॉंबच्या हाहाकाराने १९४५ साली माणूस मुळापासून हादरला होता. परंतु थोडाच काळ. पुन्हा तो सावरला. आणि हायड्रोजन बॉंब, क्षेपणास्त्रे, जैवीक आणि रासायनिक अस्त्र यांची निर्मिती, राष्ट्रवादाने पछाडल्यामुळे, करू लागला. "नो मोर हिरोशिमाज" ही हाक त्यात विरून गेली. माणसाच्या या विकृत मारणध्यासाची शोधकहाणी म्हणजेच हे पुस्तक बाराला दहा कमी.

साध्या टी. एन. टी आणि नायट्रोग्लिसरीन अशा स्फोटकांपासून अणूबॉंबपर्यंत माणसाचा स्वत:लाच नष्ट करणाऱ्या अस्त्रांचा शोध मानवाने कसा लावला याचे विहंगम आणि प्रदीर्घ विवेचन पद्मजा बाईंनी या पुस्तकात केले आहे. एकीकडे जागतिक शांततेचा उदघोष करीत आणि दुसरीकडे स्वत:च एकापेक्षा एक भयानक अस्त्र निर्मिती करण्याची दुटप्पी भूमिका जागतीक महासत्तांनी घेतलेली दिसते. म्हणजे मुहमे राम और बगल मे छुरी असे म्हणतात ना त्याप्रमाणे. आजकाल अमेरीकेबरोबर अणुकरार करायची भारताची लगबग सुरू आहे, त्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांच्या इतिहासाबद्दलचे हे पुस्तक सर्वसामान्य वाचकांसाठी मार्गदर्शक ठरते.

राजकीय नेत्यांपासून तथाकथित शांतताप्रिय शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनी या महाभयानक अस्रनिर्मितीत हिरीरीने भाग घेतला. आणि अस्त्रनिर्मिती झाल्यानंतर आपण त्या गावचे नाहीच अशी भूमिका घेऊन जागतिक शांतता प्रसाराचे काम हाती घेतले. अशा शास्त्रज्ञांच्या आणि गणमान्य नेत्यांच्या नैतिकतेवर लेखिकेने प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मानव एवढा समजूतदार आणि शहाणा प्राणि असूनही स्वत:च्याच मुळावर का उठला आहे याचे आश्चर्य वाटते. सर्व जणांनी मिळून मिसळून गुण्यागोविंदाने, या अफाट विश्वात, परमेश्वराने दिलेल्या एकुलत्या एक पृथ्वीवर सुखासमाधानाने जगायचे सोडून, हे तुझे नि हे माझे अशी स्वार्थी भूमिका घेत एकमेकांचा विनाश करण्यास तो सज्ज झाला आहे.

माझ्या मते ही निसर्गाचीच एक चाल आहे. ज्या प्रमाणे प्राणी्मात्रांत जीवन-मृत्यूचे समतोल चक्र बांधून निसर्गाने पृथ्वीवर जीवनाचा समतोल राखला आहे, त्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांत अत्यंत तल्लख बुध्दीमत्ता असलेल्या आणि समतोल राखण्यास अवघड असलेल्या मानवाचे प्रजनन आणि पृथ्वीवरचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी त्याच्या मेंदूत स्वयंनष्टचर्याचे आणि आत्मघाताचे बीज पेरले आहे. या निसर्गदत्त अंतरप्रेरणेमुळे तो सदोदीत नवी नवी हत्यारे स्वत:च्या जातभाईंविरूध्द वापरण्यासाठी बनवत राहणार आणि एक दिवस स्वत:च्या हाताने मानवजातीचा विनाश पृथ्वीवरून घडवून आणणार. त्यानंतर निसर्ग नेहमीप्रमाणे पुन्हा नवीन सजीवसृष्टी घडवण्यात गुंग होणार. कोणीही कितीही उपदेश केला अथवा हे थोपवण्याचा प्रयत्न केला तरी कोणालाही हे निसर्गचक्र थांबवणे शक्य होणार नाही.

एकंदरीत या पुस्तकात लेखिकेने अण्वस्त्रांचा इतिहास रंजकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू अनेक ठीकाणी लिखाण अनावश्यकपणे वाढले आहे त्यामुळे रटाळ वाटते. ज्या माणसाला अण्वस्त्रांची माहिती घेण्याची उत्सूकता नाही तो हे पुस्तक जास्त काळ हातात धरू शकणार नाही. ५९० पानांचे हे अगडबंब पुस्तक लेखिकेला आटोपशिरपणे २०० पानांत संपवता आले असते. त्याने पुस्तकाची कींमतही कमी झाली असती आणि कहाणीही वेगवान झाली असती. एवढ्या मोठ्या तांत्रीक पुस्तकात रेखा आणि छायाचित्रांचा पुर्णत: अभाव खटकतो. त्यांचा समावेश असता तर हे पुस्तक शतपटींनी अधिक उपयुक्त आणि रंजक झाले असते. थोडक्यात सांगायचे झाले तर विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन असणाऱ्या, अणुबॉंबविषयी उत्सूकता असणाऱ्या, तांत्रीक माहीती वाचण्याची आवड असणाऱ्या वाचकाला हे पुस्तक एकदा तरी वाचायला हरकत नाही.

लेखिकेने यापुस्तकाचे नाव एका खऱ्या घड्याळावर ठेवले आहे. अमेरीकेतील शिकागो विद्यापिठातील "बुलेटीन ऑफ एटोमीक सायंटीस्ट्स" हे नियतकालीक प्रसारीत करणाऱ्या अणुवैज्ञानिकांच्या गटाने एक सांकेतिक घड्याळ १९४७ पासून ठेवले आहे. या घड्याळाचे काटे बाराला काही मिनीटे शिल्लक असल्याची वेळ दाखवतात. यामध्ये बारा वाजता पृथ्वीचा विनाश होणार आहे असे गृहीत धरण्यात आले आहे, आणि ती वेळ येण्यास किती वेळ शिल्लक आहे हे ते घड्याळ दाखवते. पृथ्वीवर अण्वस्त्रयुगाच्या सुरूवातीपासून मानव विनाशाच्या दिशेने ढकलला गेला आहे, या विनाशाला आता किती वेळ शिल्लक आहे ते या सांकेतीक घड्याळाद्वारे हे वैज्ञानिक जगाला कळवतात. १९४७ साली हे घड्याळ सुरू केले गेले तेव्हा त्यात बाराला ७ मिनिटे कमी एवढी वेळ ठेवण्यात आली होती. या वेळेत आजतागायत १८ वेळा बदल करण्यात आले. सर्वात कमीवेळ १२ ला २ मिनिटे कमी १९५३ साली ठेवण्यात आली होती तर सर्वात जास्त वेळ १२ ला १७ मिनिटे कमी १९९१ साली ठेवण्यात आली होती. शेवटचा बदल २००७ साली १२ ला ५ मिनिटे कमी असा करण्यात आला आहे. हे घड्याळ सुरू करताना जगाला असलेला अण्वस्त्रांचा धोकाच विचारात घेण्यात आला होता. आता मात्र त्यांत सर्वप्रकारच्या मानवनिर्मित आण्विक, पर्यावरणीय आणि तांत्रिक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. या घड्याविषयी अधिक माहीती http://en.wikipedia.org/wiki/Doomsday_clock या संकेतस्थळावर मिळू शकते.

No comments: