Friday, August 3, 2007

सबकुछ "वायरलेस'

( सुरेंद्र पाटसकर, सकाळ)
संगणक, डीव्हीडी, म्युझिक सिस्टिम अशी अनेक उपकरणे आपण वापरतो. या उपकरणांपाठोपाठ येते ते वायरींचे भले मोठे जंजाळ. या उपकरणांच्या यादीत लॅपटॉप, मोबाईल, एमपी थ्री प्लेअर, आयपॉड, डिजिटल कॅमेरा यांसारख्या उपकरणांची रोज भर पडत आहे. बहुतेक सगळी नवी उपकरणे वापरण्यासाठी त्यातील बॅटरीत विद्युतशक्ती साठवलेली असते. ........
बॅटरी संपल्यावर पुन्हा "चार्ज' केली, की ते उपकरण कुठेही वापरता येते; पण या "चार्जिंग'साठी आपल्याला वायरींच्या या जंजाळात शिरावेच लागते. अनेकदा आपण बाहेर कुठेतरी असतो आणि बॅटरी संपते त्या वेळी नेमका "चार्जर' आपल्याकडे नसतो. घरी असतानाही आठवणीने बॅटरी चार्ज केली नाही की बाहेर पडल्यावर त्या उपकरणाचे ओझे होते. हे सगळे वायरींचे जंजाळ सांभाळणे, वेगवेगळ्या उपकरणांचे वेगवेगळे चार्जर सांभाळणे यापासून मुक्तता मिळू शकेल का? याचे उत्तर आता होकारार्थी द्यावे लागेल.

कोणत्याही वायरशिवाय विद्युतऊर्जेचे वहन करता येईल, असे तंत्रज्ञान अमेरिकेतील संशोधकांनी शोधले आहे. लॅपटॉप संगणकावर आपण वाय-फाय इंटरनेट सुविधा जशी वापरू शकतो; तसेच मोबाईल, डिजिटल कॅमेरा, एमपीथ्री प्लेअर आदी उपकरणे आपण चालवू शकू अथवा त्याची बॅटरी चार्ज करू शकू. मॅसाच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमधील सहायक प्राध्यापक मारिन सोलयाचिच याबाबत संशोधन करत आहेत. विद्युत चुंबकीय शक्ती व विद्युत लहरींच्या या तरंगलांबीचा वापर करून ऊर्जेचे वहन करता येणे शक्‍य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रेडिओ अथवा इन्फ्रारेड किरणे आणि क्ष-किरणांचे वहन करताना विद्युत चुंबकीय क्षेत्राचा वापर करण्यात येतो; परंतु रेडिओ लहरी गोळा करण्यासाठी ज्या प्रकारच्या अँटिना वापरले जातात, तशा अँटिना विद्युतलहरी गोळा करण्यासाठी वापरता येत नाहीत. यासाठी तांब्याची (कॉपर) विशेष अँटिना तयार करण्यात आला आहे.

या उपकरणाचे व्यावसायिक उत्पादन सुरू केल्यानंतर लॅपलॉट खऱ्या अर्थाने "वायरलेस' होऊ शकेल. सध्या साधारण पाच मीटरपर्यंत अशा पद्धतीने ऊर्जेचे वहन करण्यात संशोधकांना यश आले आहे. ब्रिटनमधील एक कंपनी स्प्लॅशपॉवरने "वायरलेस रिचार्जिंग पॅड' तयार केले आहे. त्यावर मोबाईल, डिजिटल कॅमेरा यांसारखी उपकरणे नुसती ठेवली, तरी त्याचे "चार्जिंग' होऊ शकते.

ऊर्जेचे "वायरलेस' वहन
१. ऊर्जेच्या मुख्य स्रोताकडून तांब्याच्या अँटिनापर्यंत वहन केले जाते.
२. हा अँटिना ६.४ मेगाहर्टझ तरंगलांबीने कंपन पावतो व त्यातून विद्युतचुंबकीय लहरी बाहेर सोडल्या जातात.
३. या विद्युतचुंबकीय लहरी दुसऱ्या अँटिनापर्यंत (अंतर पाच मीटर) जातात.
४. लॅपटॉपचा अँटिना या लहरी ग्रहण करतो. तो अँटिनाही ६.४ मेगाहर्टझने कंपन पावतो. या ऊर्जेचा वापर उपकरण रिचार्ज करण्यासाठी होतो.
५. लॅपटॉपकडे न जाणारी ऊर्जा परत मूळ स्रोत असलेल्या अँटिनाकडे पाठविली जाते. माणूस किंवा इतर वस्तू ६.४ मेगाहर्टझच्या तरंगलांबीनुसार कंप पावत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणताही धोका पोचणार नाही.

No comments: