सुरेश नाईक
गुरुवार, ऑगस्ट ०५, २०१०, सकाळ.
चांद्रयान - १ ही मोहीम यशस्वी झाली. आता दुसऱ्या मोहिमेची मोर्चेबांधणी सुरू आहे. ही मोहीम भारताला पुढावा देणारी आहे. मोहिमेची तयारी २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
चांद्रयान- १ ने २००९ मध्ये चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा शोध लावण्यात आघाडी घेतली आणि जगातील शास्त्रीय जगतात एकच खळबळ माजली. संबंध जगातील प्रगत देशांनीही भारतीय अवकाश शास्त्रज्ञांचे कौतुक केले.
चांद्रयान- १ हे मानवरहित अंतरिक्षयान असून त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग होते. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान (पीएसएलव्ही- सी ११) या प्रक्षेपकाद्वारे याचे प्रक्षेपण दिवाळीच्या दिवशी म्हणजे २२ ऑक्टोबर, इ.स. २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर ८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत सोडण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेल्या मून इम्पॅक्ट प्रोब (चंद्रकुपी) ला यशस्वीरीत्या वेगळे करण्यात आले. सुमारे २५ मिनिटांच्या प्रवासानंतर ही कुपी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील "शॅकलटन क्रेटर' येथे आदळली. या घनाकृती कुपीच्या चारी बाजूवर भारताचा ध्वज चित्रिला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला आहे व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला. चंद्रावर पाणी असल्याचे स्पष्ट झाल्याने चांद्रयान- १ ही मोहीम सुफळ संपूर्ण झाल्याची भारतीय अवकाश संशोधन संस्थेकडून घोषणा करण्यात आली. चांद्रयान- १ द्वारे पाण्याच्या अस्तित्वाचा शोध सुदूर संवेदन पद्धतीने करण्यात आला. या पुढची पायरी म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागाचे प्रत्यक्ष नमुने गोळा करून त्यांच्या विश्लेषणाद्वारे पाण्याच्या अंशाचे व इतर खनिजांचे अस्तित्व सिद्ध करायचे. यासाठी चांद्रयान- २ ची मोहीम हाती घेण्यात आली आहे. चांद्रयान- १ च्या नेत्रदीपक यशामुळे उत्साहित होऊन इस्रोने चांद्रयान- २ या ४२५ कोटी रु. मोहिमेच्या मोर्चेबांधणीस सुरवात केली आहे. सध्याच्या नियोजनाप्रमाणे चांद्रयान- २ च्या प्रक्षेपणाची तयारी २०१३ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
चांद्रयान- २ या अंतराळ यानाचे वस्तुमान प्रक्षेपणाच्या वेळी २४५७ किलोग्रॅम असेल. याच्यामध्ये चंद्रावर हळुवारपणे उतरणारे अवतरणयान (ल्यांडर) व चंद्राला प्रदक्षिणा घालणारे कक्षणयान (ऑर्बिटर) अशा दोन घटकांचा समावेश असेल. कक्षणयानाच्या एकूण १३१७ किलो वस्तुमानापैकी त्यातील इंधनाचे वस्तुमान ८३० किलो, कक्षणयानाच्या सांगाड्याचे व इतर उपप्रणालींचे ४३७ किलो आणि शास्त्रीय प्रयोगांचे ५० किलो असेल. या ५० किलोपैकी १० किलो आंतरराष्ट्रीय अवकाश संस्थांच्या प्रयोगांसाठी असेल. अवतरणयान जेव्हा पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा त्याचे वजन ११०० किलो असेल. चंद्राच्या पृष्ठभागावर त्याचे वजन ४२० किलो भरेल. ल्यांडरवर दोन बग्ग्या (रोव्हर्स) असतील. त्यातील रशियन बग्गीचे वजन असेल ५० किलो आणि भारतीय बग्गीचे वजन असेल १५ किलो.
बग्ग्या चंद्रावर कशा पोचतील? -
प्रक्षेपणानंतर कक्षणयान व अवतरणयानासह दोन बग्ग्या यांची जोडगोळी यांना एकत्रितपणे पृथ्वीच्या १८० स २४००० कि.मी. या अंडाकृती कक्षेत सोडून पीएसएलव्ही प्रक्षेपण यान अलग होईल. नंतरच्या पृथ्वीच्या प्रदक्षिणेत कक्षणयानापासून ही जोडगोळी विभक्त होईल व ही दोन्ही याने अलगपणे चंद्राकडे कूच करतील. अवतरण यान दोन बग्ग्यांसह पहिल्यांदा चंद्राच्या १०० कि.मी.च्या कक्षेत स्थिरावेल. यानंतर ही जोडगोळी चंद्रावर उतरेपर्यंतच्या सर्व क्रिया शास्त्रज्ञांच्या दृष्टीने अत्यंत तणावपूर्ण व थरारजनक असतील. नंतरच्या चंद्राभोवतालच्या प्रदक्षिणेत या जोडगोळीची कक्षा उत्तर ध्रुवाकडे १०० कि.मी. व दक्षिण ध्रुवाकडे १८ कि.मी. अशी राहील. १८ कि.मी.पासून उंची २ कि.मी.पर्यंत आल्यानंतर ब्रेक लावून या जोडगोळीला हळुवारपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाईल. यानंतर लगेच कक्षणयानाला चंद्राभोवतालच्या त्याच्या निर्धारित कक्षेमध्ये स्थिरावले जाईल. यानंतर एकापाठोपाठ दोन्ही बग्ग्यांना चंद्राच्या पृष्ठभागावर उतरविले जाईल. बग्ग्यांवर असलेल्या यांत्रिक हाताद्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचे नमुने गोळा करून ती माहिती कक्षणयानाद्वारे भूकेंद्राला उपलब्ध केली जाईल.
या मोहिमेमध्ये अंतराळयानांचे अवकाशामध्ये घेऊन जावयाचे वजन पीएसएलव्ही या प्रक्षेपणयानाच्या कुवतीपेक्षा अधिक असल्याने जीएसएलव्ही या अधिक प्रक्षेपण क्षमतेच्या अग्निबाणाचा उपयोग करावा लागेल. जीएसएलव्हीचे (भारतीय बनावटीच्या क्रायोजनिक इंजिनासह) तीन महिन्यांपूर्वीचे उड्डाण अयशस्वी झाल्यामुळे चांद्रयान- २ मोहिमेमध्ये रशियन बनावटीचे क्रायोजेनिक वापरायचे, की काय याचा निर्णय घ्यावा लागेल.
Sunday, August 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment